परभणी दि.02 : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा जल दिंडी 2026’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यसाठी पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर पेठे येथे अभियान राबविण्यात आले.
यावेळी जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, पोलिस पाटील ज्ञानोबा काटकर, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे प्रतिनिधी सुदर्शन चापके, ज्येष्ठ नागरिक शेषराव चापके, दादाराव चापके, रयत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रवीण प्रशिक्षक गजानन सुरवासे, रिलायन्स फाउंडेशनचे प्रतिनिधी भरत शिंदे उपस्थित होते.
या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा-पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचे संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. अभियानाद्वारे युवकांना जल व्यवस्थापनातील सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले जात असल्याचे माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितले.
पाण्याचे महत्त्व समजावून पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यासाठी विहीर, बोअरवेल, शेततळी, तलाव, ओढे व नद्यांसारख्या जलस्रोतांचे संरक्षण व पुनर्भरण करण्याची माहिती आणि त्याचे फायदे रयत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे प्रवीण प्रशिक्षक गजानन सुरवासे यांनी उपस्थितांना सांगितले.
तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जागृती निर्माण करून युवकांनी जलसंवर्धन चळवळ उभारून जलसंवर्धनावर प्रभावीपणे काम केले पाहिजे, असे रिलायन्स फाउंडेशनचे प्रतिनिधी भरत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
जल दिंडीमध्ये रॅली, घोषवाक्ये तसेच विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, “जल हेच जीवन” आणि “प्रत्येक थेंब अमूल्य आहे” हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पाणी फाउंडेशनच्या नारी शक्ती महिला शेतकरी गट आणि युवकांनी या जल दिंडीत सहभागी होऊन गावात घरोघरी जनजागृती केली तसेच जलसर्वेक्षण करून ऑनलाइन माहिती भरून घेतली.






