गंगाखेड (प्रतिनिधी) :-
ग्रामीण भागातील प्रत्येक गाव सक्षम रस्त्यांद्वारे शहरांशी जोडले गेले, तर शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतात. पायाभूत सुविधांमध्ये झालेली गुंतवणूक ही भविष्यातील समृद्धीची हमी ठरते. कारण चांगले रस्ते हे केवळ एका गावाला दुसऱ्या गावाशी जोडणारे मार्ग नसतात, तर ते विकासाचे प्रवेशद्वार असतात, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
तालुक्यातील मौजे.वागदरी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ अंतर्गत प्रजिमा-१९ ते वागदरी जिल्हा सरहद्द या सुमारे ३ किलोमीटर रस्ता सुधारणा कामाचा शुभारंभ आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांना काम निर्धारित कालावधीत, उच्च दर्जाच्या निकषांचे पालन करून पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शासनाचा निधी हा जनतेचा पैसा असल्याने प्रत्येक रुपयाचा उपयोग गुणवत्तापूर्ण विकासासाठीच झाला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
वागदरी ते जिल्हा सरहद्द हा रस्ता या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या सुधारणा कामामुळे वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून कृषी उत्पादनाची बाजारपेठेशी जोडणी अधिक मजबूत होईल. त्याचबरोबर या परिसराच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी हा रस्ता भक्कम पाया ठरेल, असा विश्वासही आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे विकासकामांचा वेग अधिक वाढविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत प्रत्येक गावापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविणे हेच आपल्या लोकप्रतिनिधित्वाचे ध्येय असल्याचे आ.डॉ.गुट्टे यांनी स्पष्ट केले. विकास हा केवळ आश्वासनांचा विषय नसून तो प्रत्यक्ष कृतीतून जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच आपली भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
यावेळी समाज कल्याण सभापती लक्ष्मण मुंडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष हनुमंत मुंडे, मित्रमंडळाचे प्रभारी बालाजी लटपटे, नगरसेवक संदीप सानप यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह गुट्टे काका मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Total Users : 254684