spot_img
spot_img
spot_img

देशपातळीवरील “खेत बचाओ अभियान”मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची सक्रिय भूमिका

 

परभणी प्रतिनिधी

मृदा आरोग्य संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे संकल्प करूया : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या “खेत बचाओ अभियान”मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून सक्रिय सहभाग नोंदविण्यात येणार असल्याची माहिती विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी दिली.

 

कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रे आणि कृषि प्रसार यंत्रणा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, मृदा परीक्षणाला चालना देण्यासाठी तसेच अभियानाची उद्दिष्टे गावागावांत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्यरत राहतील. विविध प्रात्यक्षिके, मार्गदर्शन शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि शेतकरी संवादाच्या माध्यमातून मातीचे आरोग्य जपण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. यानिमित्त माननीय कुलगुरूंनी सर्व शेतकरी, विद्यार्थी, कृषि अधिकारी आणि नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, आपली माती निरोगी, शेती लाभदायक आणि कृषि शाश्वत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे संकल्प करूया.

 

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, या अभियानांतर्गत मृदा आरोग्य संवर्धन, संतुलित खतांचा वापर, जैविक व हरित खतांना प्रोत्साहन, शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे तसेच शेतकऱ्यांना वेळेवर वैज्ञानिक व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. हे अभियान केवळ शासकीय उपक्रम नसून शाश्वत व लाभदायी शेतीसाठीचे व्यापक जनआंदोलन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles