spot_img
spot_img
spot_img

गोदावरी नदीच्या पूररेषा सर्वेक्षणाला अंतिम मंजुरी आ.डॉ.गुट्टे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश : ८ कोटींचा निधी मंजूर, आपत्ती व्यवस्थापनास बळ

 

गंगाखेड (प्रतिनिधी):-
परभणी जिल्ह्यातील जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीच्या पूरस्थितीचा वैज्ञानिक अभ्यास करून भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्थानिक आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळाले असून, गोदावरी नदीच्या पूररेषा सर्वेक्षणास शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. तसेच या अतिशय महत्त्वाकांक्षी सर्वेक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गोदावरी नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे परभणी जिल्ह्यातील गोदाकाठावरील अनेक गावांमध्ये जीवित व वित्तहानीची समस्या निर्माण होत असते. नदीकाठावरील वस्ती, शेती, सार्वजनिक मालमत्ता आणि पायाभूत सुविधांवर याचा मोठा परिणाम होतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन पूररेषांचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याची मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती. अखेर या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गोदावरी नदीच्या दोन्ही तीरावरील पूरप्रवण क्षेत्रांचे अचूक मोजमाप करण्यात येणार आहे. पूर कोणत्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकतो, कोणती गावे धोक्याच्या क्षेत्रात येतात, भविष्यातील संभाव्य धोके कोणते असू शकतात, याचा शास्त्रीय व तांत्रिक अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे पूरनियोजन अधिक अचूकपणे करणे प्रशासनाला शक्य होणार आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण केवळ नकाशे तयार करण्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नदीकाठावरील वस्ती, शाळा, सार्वजनिक इमारती आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे जोखीम मूल्यांकन करण्यात येणार असल्याने भविष्यातील विकास आराखड्यांनाही दिशा मिळणार असल्याचे आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून नमूद केले.

तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून मंजूर करण्यात आलेला ८ कोटी रुपये निधीतून आधुनिक तंत्रज्ञान, भौगोलिक माहिती प्रणाली आणि तांत्रिक मोजमापांच्या आधारे पूररेषांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याने या अहवालाची विश्वासार्हता अधिक वाढणार आहे. शिवाय या सर्वेक्षणामुळे महसूल विभाग, जलसंपदा विभाग तसेच जिल्हा प्रशासनाला पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने आणि अचूक उपाययोजना करणे सुलभ होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर, बचावकार्य, मदत वितरण तसेच पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वैज्ञानिक माहिती उपलब्ध होणार आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.

गोदावरी नदीकाठावरील अनेक गावांमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. पूररेषांचे अधिकृत सर्वेक्षण झाल्यानंतर संभाव्य धोक्याच्या क्षेत्रांची स्पष्ट नोंद होईल आणि भविष्यात अनियोजित बांधकामांवरही नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने हा निर्णय दिलासादायक आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजन करण्याच्या दिशेने शासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया आ.डॉ.गुट्टे यांनी दिली.

दरम्यान गोदावरी नदीच्या पूररेषा सर्वेक्षणाचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील पूर व्यवस्थापनाला वैज्ञानिक अधिष्ठान प्राप्त होणार असून, नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी हा निर्णय दीर्घकालीनदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून नमूद केले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles