परभणी, दि. 17 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत जिल्ह्यातील प्रकल्प गावातील नोंदणीकृत महिला शेतकरी गट यांच्या मार्फत गावस्तरावर ‘कृषी अवजारे बँक’ स्थापन करुन भाडेतत्वावर यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत ‘एक गाव-एक कृषी अवजारे बँक’ या संकल्पनेनुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आला आहे.
सदर योजनेसाठी एफपीओ-डीबीटी (https://dbt-ndksp-agribusiness.mahapocra.in/) पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू असून ५ एप्रिल २०२६ ही अर्जाची अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) दौलत सुदाम चव्हाण यांनी केले आहे.
प्रकल्प गावांतील एमएसआरएलएम (उमेद) व माविम पुरस्कृत महिला बचत गट आणि महिला गाव संघ व नोंदणीकृत महिला शेतकरी गट अर्जासाठी पात्र ठरणार आहेत. एका गावातून एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास निवड प्रक्रिया ऑनलाईन लॉटरीद्वारे केली जाणार आहे.
महिला शेतकरी केवळ शेतीपुरत्या मर्यादित न राहता यंत्रसामग्री व्यवस्थापन व सेवा क्षेत्रातही पुढे याव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे महिला गटांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल, तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कृषी अवजारे मिळण्यास मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) दौलत सुदाम चव्हाण यांनी सांगितले.











Total Users : 254687