परभणी, दि. 7 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी उत्साहात व शांततेत साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, मनपा उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सेलूचे नगरअध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके आदींसह संबंधित विभागांचे प्रमुख, समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदात साजरी करण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल. डॉ. आंबेडकरांचे थोर विचार सर्वांनी आत्मसात करावेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करुन समाजात एक आदर्श निर्माण करावा. जयंती साजरी करताना अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. जर कुठे अनुचित प्रकाराची खबर मिळाल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी.
दि. 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. तसेच सन 2026 हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे व्दिशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या अनुषंगाने दि. 11 एप्रिल रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात “क्रांतीचा साक्षीदार” हे एकपात्री नाटय आयोजित करण्यात आले आहे, याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामंजस्याने व आनंदाने साजरे करावी. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. समाजमाध्यमांवर पोस्ट करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.






