spot_img
spot_img
spot_img

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती;* *विविध योजनांतून जिल्हयाचा सर्वांगीण बदल* *– पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर* *महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न* *नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्व-गणना करावी* *थॅलेसेमिया मुक्तीची उपस्थितांनी घेतली शपथ*

 

परभणी, दि. १ — जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रात ठोस बदल घडवले जात आहेत. सौर ऊर्जा उपक्रम, शेतपाणंद योजना आणि डिजिटल सेवा यांसारख्या उपक्रमांमुळे जिल्हयाच्या विकासाला नवी गती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडीयमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण हे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते पार पाडले. त्यावेळी शुभेच्छा संदेश देताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदींसह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थितांना पालकमंत्री यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी आपल्या संदेशात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान समाजसुधारकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे त्यांनी आवाहन केले.

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, देशातील डिजिटल जनगणना प्रक्रियेस सुरुवात झाली असून १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना सुरू आहे. या प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नागरिकांनी जनगणना पोर्टलवर अचूक माहिती भरावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे तसेच जूनमध्ये होणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. बालविवाहासारख्या कुप्रथांविरुद्ध जागरूक राहून 1098 या क्रमांकावर माहिती देण्याचेही सांगण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी विविध योजना, सौर कृषी पंप, आणि शेतरस्ते विकास उपक्रम राबविण्यात येत असून शेती अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली असून विविध अभियानांद्वारे नागरिकांचे आरोग्य सक्षम करण्याचे काम सुरू आहे. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन करण्यात आले. घरकुल, सौर ऊर्जा आणि सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जीवनमान उंचावण्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले.

महसूल विभागाच्या उपक्रमांमधून हजारो लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला असून डिजिटल गाव नकाशे, व्हॉट्सएप चॅटबॉट आणि आपत्ती व्यवस्थापन प्रणालीमुळे प्रशासन अधिक गतिमान झाले आहे. जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात समावेश झाल्याने आरोग्य, शिक्षण, शेती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

औद्योगिक विकासासाठी परभणीला “उदयोन्मुख जिल्हा” दर्जा मिळाल्याने गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस यंत्रणेला आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. कामगार दिनानिमित्त कष्टकरी वर्गाच्या योगदानाचे कौतुक करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

शेवटी थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रसाठी पालकमंत्री यांनी उपस्थित सर्वांना थॅलेसेमिया मुक्तीची शपथ दिली.

प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तत्पुर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडुंना सन्मानपत्र देण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते बालविवाह प्रतिबंध लघुपट व पोस्टरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles