परभणी, दि. १५: ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार, सर्वसमावेशक व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून परभणी जिल्ह्यात ‘पालकमंत्री आरोग्यदूत अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३७ प्राथमिक आरोग्य केंद्र,२१५ आयुष्मान आरोग्य मंदिरां मार्फत समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांच्या पथकाद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा त्यांच्या गावात घराजवळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निश्चित कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यानुसार आरोग्यदूत पथके गावोगावी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार, समुपदेशन व आरोग्यविषयक जनजागृती करणार आहेत. यामुळे नागरिकांना किरकोळ तसेच प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य समस्यांसाठी दूरच्या आरोग्य संस्थांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.
*१३ प्रकारच्या दर्जेदार आरोग्य सेवांवर विशेष भर*
*या अभियानांतर्गत माता व बाल आरोग्य सेवा, नियमित लसीकरण, किशोरवयीन आरोग्य सेवा, डोळ्यांच्या विकारांची तपासणी, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, रक्तक्षय प्रतिबंध, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, क्षयरोग व कुष्ठरोग शोध, डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शुद्ध पिण्याचे पाणी व आरोग्यविषयक समुपदेशन आदी सेवांवर भर देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधांचे वितरण व प्राथमिक उपचारही उपलब्ध करून देण्यात येतील.*
अभियानांतर्गत गावोगावी आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये नियमित बाह्यरुग्ण सेवा, तपासणी व औषधोपचार सुरू राहतील. निश्चित कृती आराखड्यानुसार आरोग्यदूत पथके गावांमध्ये गृहभेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी व आरोग्य सर्वेक्षण करणार आहेत. आवश्यकतेनुसार टेलिमेडिसिन व डिजिटल माध्यमातून वैद्यकीय सल्ल्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
*३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २१५ उपकेंद्रांच्या माध्यमातून अंमलबजावणी*
परभणी जिल्ह्यातील ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २१५आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW) व आरोग्य सेविका (ANM) यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण व गर्भवती मातांना या अभियानांतर्गत प्राधान्याने आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला वेळेत आरोग्य तपासणी, योग्य निदान व आवश्यक उपचार उपलब्ध व्हावेत, तसेच प्राथमिक आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख व नागरिककेंद्रित व्हाव्यात, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पालकमंत्री आरोग्यदूत अभियानामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळून आरोग्य सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचण्यास मदत होणार आहे.









Total Users : 255289