spot_img
spot_img
spot_img

परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट; उष्मालाट व पावसाचा इशारा उष्मालाटेत जनतेने विशेष काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

 

 

परभणी , दि. 17 : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दि. १७, १८, १९ व २० एप्रिल २०२६ या चार दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे.

 

दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर दि. १८ एप्रिल रोजीही उष्मालाट राहण्याची शक्यता आहे. दि. १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

 

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी/ओढणी वापरणे आणि हलके, सैल कपडे परिधान करावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी विशेष दक्षता घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

 

उष्मालाट काळातील घ्यावयाची काळजी

 

काय करावे :- तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या. हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करा. दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळा. बाहेर जाताना डोके झाका, टोपी/छत्री वापरा, गॉगल व सनस्क्रीनचा वापर करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा. अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करा. पशुधन सावलीत ठेवा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या.

 

काय टाळावे :- दुपारी उन्हात बाहेर जाणे व कष्टाची कामे करणे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळा. मद्यपान, चहा, कॉफी, शीतपेये टाळा. जास्त तेलकट, तिखट, मिठाचे व शिळे अन्न खाऊ नका. वाहनात लहान मुले किंवा प्राणी बंद करून ठेवू नका. गडद व जाड कपडे परिधान करणे टाळा. तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रम टाळा. नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles