परभणी, दि. 18 – राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. विविध पुरस्कारांसाठी यापूर्वी दि. २० मार्च २०२६ पर्यंत अर्ज सादर करणेकरीता कळविण्यात आले होते. परंतु आता मुदतवाढ करण्यात आली असुन शेतक-यांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पुरस्कार प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.
पूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://knshi.maharashtra.gov.in) कृषी पुरस्कार टैब मध्ये उपलब्ध आहे. सदर टॅबवर शेतक-यांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पुरस्कार प्रस्ताव सादर करावेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्काराकरीता फार्मर आयडी नंबर व जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराकरीता आधार क्रमांक आवश्यक आहे. तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे
ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्याऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. अर्ज कुठल्या टप्यावर आहे याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. तरी इच्छुक शेतकरी/व्यक्ती/संस्था/गट यांना सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावेत, असे श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.






