spot_img
spot_img
spot_img

*तापमान वाढतेय… आरोग्य जपा, सुरक्षित राहा…!* *उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी*  – *जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण*

 

 

परभणी दि. 15  : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे ‘उष्माघात’ (Heat Stroke) होण्याचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना व आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत प्रस्ताव शासनास सादर करणे संदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणअंतर्गत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते.

 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मनपा आयुक्त नितिन नार्वेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, परंतु योग्य काळजी घेतल्यास आपण त्यापासून वाचू शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क असून उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती व लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलित कक्ष व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

 

नागरिकांनी तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, उलटी,चक्कर, हृदयाचे ठोके वाढणे, अन्न घेण्यास नकार , चिडचिडेपणा व लघवीचे प्रमाण कमी झाल्यास किंवा तोंडाजवळील त्वचा कोरडी अशी लक्षणे जाणवताच उष्माघातापासून वेळीच आपला बचाव करावा

 

*नागरिकांनी घ्यावयाची काळजी (काय करावे?*):

 

*पुरेसे पाणी प्या.* तहान लागलेली नसली तरीही वारंवार पाणी प्या. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.

पेयांचा वापर: लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS) किंवा घरगुती उपलब्ध असलेल्या पेयांचा वापर करा, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील.

 

*पोशाख:* बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.

 

*दुपारची वेळ टाळा* -दुपारी १२ ते ३:३० या वेळेत कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.

 

*आहारावर नियंत्रण*: पचायला हलके आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले हंगामी फळे (कलिंगड, संत्री, द्राक्षे) खावीत.

 

*काय टाळावे?*

* दुपारच्या वेळी कष्टाची कामे उन्हात करणे टाळावे.

* चहा, कॉफी किंवा मद्यपान करणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

* बंद असलेल्या उभ्या वाहनात लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.

 

*इतर खबरदारी*

एकटे राहणारे वृद्ध किंवा आजारी लोकांचे पर्यवेक्षण केले पाहिजे आणि त्याच्या आरोग्याचे दैनंदिन निरीक्षण केले पाहिजे.तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि जाळ्यांचा वापर करून खिंडक्या उघड्या ठेवा.

शरीर थंड करण्यासाठी पंखे, कुलर फळांची भरपूर सरबते, ओले कापड, बर्फाचा वापर करावा.

 

*उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काय करावे?*

 

जर एखाद्या व्यक्तीला खूप ताप येणे, चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटत असल्यास, त्याला त्वरित सावलीत बसवावे, ओल्या कपड्याने शरीर पुसावे आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.

 

*जोखमीच्या लोकांसाठी*

कोणालाही उष्णतेचा त्रास आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो, तरीही काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो आणि त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष दिले पाहिजे, मुख्यतः लहान मुले आणि बालके, घराबाहेर काम करणारे लोक गर्भवती महिला, ज्या लोकांना मानसिक आजार आहे,शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब इत्यादी.

 

नागरिकांनी जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे, उष्ण वातावरणात शारीरिक क्रिया हळूहळू वाढल्याने शरीरात भरपूर पेयजल घ्यावेत.

 

नागरिकांनी स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles