पालम/प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी ‘विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर २० २६’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पालम तालुक्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मंगळवार १७ मार्च रोजी पालम तहसील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीत एप्रिल २०२६ पासून महाराष्ट्रात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्याआधी ९७-गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पालम तालुक्यात पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी प्रशासनाने ‘प्रोजेनी मॅपिंग’ ही नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २००२ च्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांची त्यांच्या आई-वडील किंवा आजी आजोबांच्या नोंदींशी पडताळणी केली जाणार आहे. यामुळे वंशावळीच्या आधारे मतदारांची अचूक ओळख पटवणे सोपे होणार आहे. सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन तसेच
मोबाईलद्वारे नागरिकांशी संपर्क साधत आहेत. या सर्व्हेमध्ये २००२ च्या मतदार यादीतील माहिती संकलन, नाव, वय, लिंग व फोटोतील चुका दुरुस्ती, तसेच दुबार व मयत मतदारांची नावे वगळण्यावर भर दिला जात आहे.
पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी प्रत्येक सर्वच राजकीय पक्षाला प्रत्येक मतदान केंद्रावर ‘बीएलए प्रतिनिधी’ नियुक्त करण्याचे आवाहन केले. यामुळे प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असे त्यांनी नमूद केले. बैठकीत तहसीलदार वाघमारे यांनी प्रशासनाचा मुख्य उद्देश मतदार यादी पूर्णपणे दोषमुक्त करून १०० टक्के शुद्ध करणे असल्याचे स्पष्ट केले. यासाठी सर्व बीएलओ आणि पर्यवेक्षकांना निर्धारित मुदतीत मॅपिंग आणि फोटो दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनाही प्रशासनाने आवाहन केले आहे की, बीएलओ घरोघरी येत असताना त्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, जेणेकरून कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही.






