एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ; नागरिकांना दिलासा
एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ
नागरिकांना सुलभपणे सेवा देण्यासाठी समाधान शिबिर उपयुक्त
— जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
परभणी, दि. 14 परभणी तालुक्यातील मौजे सिंगणापूर या महसूल मंडळाच्या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व सिंगणापूर येथील प्रशासक तथा सरपंच शारदाताई पांडुरंग खिल्लारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
शिबिरामध्ये महसूल विभागासहीत विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे एकाच दिवसात एक हजार 41 लाभधारकांना लाभ वितरित करण्यात आले.
शासनाच्यावतीने राबविण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे अभियान नागरिकांच्या महसूल विषयक समस्या सोडविण्यासाठी व लाभार्थ्यांना विविध विभागांचे लाभ एकाच छताखाली मिळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या माध्यमातून प्रशासन गावात येऊन थेट नागरिकांच्या समस्या ऐकत आहे. विविध विभाग या अभियानात सहभागी झाले आहेत. नागरिकांना कुठलाही त्रास न होता सुलभपणे लाभ मिळून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, प्रगतीशील शेतकरी एकनाथराव साळवे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिबिरात महसूल विभागामार्फत 43 प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले. 120 डिजिटल सातबारा, 110 आठ-अ कागदपत्रचे वाटप करण्यात आले. 7 अर्जावर एक खिडकीतून कार्यवाही करण्यात आली. निराधार योजनेचा 35 लाभार्थींना लाभ मंजूर करण्यात आला. पुरवठा विभागाचे 42 तर 147 विविध प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. तसेच रोजगार हमी विभागाचे- 12, महिला व बालविकास- ५० पंचायत समिती घरकुल लाभार्थी – 29 जिल्हा कौशल्य विभाग -26, आयुष्मान भारत कार्ड – 68 नोंदणी व मुद्रांक विभाग – 16 पशुसंवर्धन विभाग – 151 तालुका कृषी अधिकारी कार्यालय – 38, आर्थिक साक्षरता – 40, जिल्हा महिला बालविकास – 41, आधार केंद्र- 13 भुमिअभिलेख विभागाच्यावतीने 42 लाभ वितरित करण्यात आले. शिबिरात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी विभागप्रमुखांनी नागरिकांना योजनांविषयी मार्गदर्शनही केले.
शिबिरास मंडळातील सर्व गावांचे नागरिक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महसूल मंडळातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सिंगणापूर महसूल मंडळ अधिकारी प्रवीण खाडे, सिंगणापूर महसूल मंडळातील ग्राम महसूल अधिकारी संजय गोटे, रोहित ढवळे, रघुनाथ फलफले, दीक्षा खंदारे, प्रणिता वाघमारे, कांचन वसेकर, ग्रामपंचायत अधिकारी रामकुमार पवार, कृषी सहायक श्री गोरे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, विविध विभागांचे ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते.






