spot_img
spot_img
spot_img

कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट हे. एक लाख रुपयांची आर्थिक मदत करा गुट्टे काका मित्र मंडळाचे प्रशासनाला लेखी निवेदन: पशुधनांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

 

गंगाखेड (प्रतिनिधी) :
विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले. स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गंगाखेड, पालम आणि पूर्णा तहसीलदारांसह परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे निवेदन देण्यात आले असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची लेखी मागणी करण्यात आली आहे.

यंदाची परिस्थिती ही केवळ पावसाच्या अनियमिततेपुरती मर्यादित नसून, तिचा थेट परिणाम शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. पिकांची खुंटलेली वाढ, उत्पादनात घट होण्याची शक्यता, वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे बाजारातील महागाई यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या अधिक खोल गर्तेत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींकडे केवळ महसुली आकडेवारी म्हणून न पाहता मानवी संवेदना आणि सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याची संवेदनशील भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

विधानसभा मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. त्यासोबतच मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाचे साधन राहिले नसताना त्यांना केवळ आश्वासनांऐवजी शासनाच्या मदतीचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

दुष्काळाचा सर्वाधिक फटका शेतीबरोबरच पशुधनाला बसत असल्याने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पुरेशा चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व शाश्वत व्यवस्था करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. ग्रामीण भागातील पशुधन हे शेतकरी कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याने दुष्काळाच्या काळात त्यांचे संरक्षण करणे ही प्रशासनाचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.

गावागावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली. नागरिक आणि पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता ही कोणत्याही परिस्थितीत बाधित होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळाच्या संकटाकडे केवळ आपत्कालीन स्वरूपात न पाहता दीर्घकालीन जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तातडीने मिळवून देणे, आवश्यक त्या सवलती व मदत उपलब्ध करून देणे तसेच प्रशासनाने गावपातळीवर प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. संकटाच्या काळात शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेतला, तर हजारो शेतकरी कुटुंबांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे निवेदनातील मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून प्रत्यक्ष मदत पोहोचवावी, अशीही अपेक्षा गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

यावेळी गुट्टे काका मित्र मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीसह सर्व तालुक्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकरी, पशुपालक आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या प्रश्नांना प्रशासनाच्या पातळीवर वाचा फोडण्यासाठी संघटित प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles