spot_img
spot_img
spot_img

दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पालम कडकडीत बंद


पालम – दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा दर्शवित पालम येथे वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष व संघटनांच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला पालम शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने बंद शांततेत पार पडला.
बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी पालम तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांवर अशा प्रकारे बळाचा वापर करणे लोकशाही मूल्यांना बाधा आणणारे असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मंगेश धनसडे, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत रायबोले, माधव हत्तीआंबिरे, सलमान पठाण, अरबाज पठाण, अविनाश हानवते, अनिल राठोड, हाकानी पठाण, साळवे, शंकर नरवाडे, राजू पठाण, सदाम शेख, राजकुमार जोंधळे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात जागोजागी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चौकट ——-

पालम बंदला काँग्रेसचा पाठिंबा; तहसीलदारांना निवेदन

दिल्ली येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या पालम बंदला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही जाहीर पाठिंबा दिला. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होत निषेध नोंदविला तसेच तहसीलदारांना निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना पालम तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माधवराव फाजगे यांनी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांवर बळाचा वापर करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगितले. या प्रसंगी पालम तालुका काँग्रेस अध्यक्ष माधवराव फाजगे, अकबर खा पठाण, शहराध्यक्ष साबिर कुरेशी, वैजनाथ हत्तीआंबिरे, निवृत्ती हत्तीआंबिरे, माणिकराव असले, सुरेश मोडके, माधवराव चौरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles