spot_img
spot_img
spot_img

महिलांचे सक्षमीकरण म्हणजे राष्ट्रनिर्मितीचा भक्कम पाया – आ.डॉ.गुट्टे उत्कर्ष लोक संचालित साधन केंद्राची वार्षिक सभा : ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचे कौतुक

 

ताडकळस (प्रतिनिधी) :-
ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांत आत्मविश्वास, कष्ट आणि जिद्दीच्या बळावर विकासाची नवी दिशा निर्माण केली आहे. शिवाय एकेकाळी केवळ घरापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आज बचत गट, लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, स्वयंरोजगार, प्रक्रिया उद्योग आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहेत. त्यामुळे ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण महिलांचे सक्षमीकरण म्हणजे सक्षम समाज आणि समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा भक्कम पाया असतो, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

येथील उत्कर्ष लोक संचालित साधन केंद्राची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आ.डॉ.गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित महिला भगिनींशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव केला. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), परभणी अंतर्गत तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सबलीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सभा आयोजित करण्यात आली होती.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न वाढत नाही, तर मुलांच्या शिक्षणापासून आरोग्यापर्यंत अनेक क्षेत्रांत सकारात्मक बदल घडतो. महिलांच्या हातात आर्थिक सक्षमतेची किल्ली गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब अधिक स्थिर आणि सक्षम बनते. त्यामुळे महिला सक्षमीकरण ही केवळ सामाजिक चळवळ नसून शाश्वत विकासाची प्रभावी संकल्पना आहे.

महिला बचत गट आणि माविमच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागात उद्योजकतेचे नवे पर्व सुरू झाले आहे. महिलांनी सामूहिक नेतृत्व, आर्थिक शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम समन्वय साधत अनेक यशस्वी उपक्रम उभे केले आहेत. या कार्यामुळे गावागावांत आत्मनिर्भरतेची नवी चळवळ निर्माण होत असून ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.

महिलांना सक्षम करण्यासाठी केवळ आर्थिक मदत पुरेशी नसते, तर त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि आत्मविश्वासाची जोड मिळणेही तितकेच आवश्यक असते. माविमने या सर्व बाबींचा विचार करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य उभारले असून ते निश्चितच प्रेरणादायी आहे. कारण महिला सक्षम झाल्या, तर कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम झाले, तर समाज प्रगत होतो आणि समाज प्रगत झाला तर राष्ट्र अधिक समृद्ध बनते. त्यामुळे महिलांच्या स्वप्नांना बळ देणे, त्यांच्या क्षमतांना योग्य संधी उपलब्ध करून देणे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा सन्मानाने सहभाग वाढविणे ही समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी अधोरेखित केले.

यावेळी गुट्टे काका मित्र मंडळाचे प्रभारी बंटी कदम, ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार यांच्यासह महिला आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles