spot_img
spot_img
spot_img

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा; मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) पूर्ण सहकार्य करा* *– जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण*

 

परभणी, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, पारदर्शक व त्रुटीमुक्त करण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरभेटी देऊन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) वितरित करीत आहेत. या महत्त्वपूर्ण लोकशाही प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, मतदार, राजकीय पक्ष, महिला, युवक तसेच विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन मतदारांची माहिती पडताळतील, गणना फॉर्म उपलब्ध करून देतील, तो भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करतील आणि निर्धारित कालावधीत भरलेले फॉर्म स्वीकारतील. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, कुटुंबातील पात्र मतदारांची माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची अचूक पडताळणी करून मतदार यादी अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी भेट देतील तेव्हा नागरिकांनी त्यांचे स्वागत करून आवश्यक ती अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी. गणना फॉर्म काळजीपूर्वक भरावा व कोणतीही माहिती अपूर्ण अथवा चुकीची राहणार नाही याची दक्षता घ्यावी. स्वतः फॉर्म भरता येत नसल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आवश्यक मार्गदर्शन करतील.

नागरिकांनी घरभेटीदरम्यान खालील बाबींची तयारी करून ठेवावी :

* गणना फॉर्म भरण्यासाठी आवश्यक वैयक्तिक माहिती.
* मतदार ओळखपत्र (EPIC) उपलब्ध असल्यास त्याचा क्रमांक किंवा प्रत.
* आधार क्रमांक (स्वेच्छेने उपलब्ध करून देण्यास इच्छुक असल्यास).
* जन्मतारीख सिद्ध करणारा पुरावा (लागू असल्यास).
* राहत्या पत्त्याचा पुरावा.
* कुटुंबातील सर्व पात्र मतदारांची माहिती.
* नव्याने पात्र झालेल्या मतदारांची माहिती.
* मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा अन्यत्र वास्तव्यास गेलेल्या मतदारांची माहिती.
* आवश्यकतेनुसार इतर संबंधित कागदपत्रे.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी विशेषतः सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचतगट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांना या मोहिमेत जनसहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत ही माहिती पोहोचवून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांचा पत्ता शोधणे, गणना फॉर्म वितरित करणे आणि भरलेले फॉर्म संकलित करणे यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे टाळावे. अचूक माहिती उपलब्ध करून देणे ही प्रत्येक नागरिकाची लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे परभणी जिल्ह्याची मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून लोकशाही अधिक सक्षम करण्याचा सामूहिक प्रयत्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना वेळेवर प्रतिसाद देऊन आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, गणना फॉर्म अचूक भरून द्यावा आणि भारत निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles