spot_img
spot_img
spot_img

लोडशेडिंग व गणेशपुरी मठ विकासासाठी आमदार डॉ.गुट्टेंचे मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन फिडर सेपरेशनसाठी कंत्राटदारावर कठोर कारवाईची केली मागणी : प्राचीन मठासाठी क्षेत्र विकास आराखडा सादर करण्याची विनंती

 

गंगाखेड (प्रतिनिधी):-
विधानसभा मतदारसंघातील लोडशेडींगसह विविध समस्या व अडचणींविषयी आणि गणेशपुरी मठ संस्थान क्षेत्र विकास आराखडा मागवणे याविषयी स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन दोन स्वतंत्र लेखी निवेदने दिली. त्याद्वारे सततची लोडशें​डींग दूर करण्यात यावी आणि प्राचीन गणेशपुरी मठाच्या विकासासाठी तातडीने आराखडा मंजूर करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. शिवाय या दोन्ही निवेदनांवर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

मतदारसंघातील विजेची समस्या आता नागरिकांच्या सहनशक्तीपलीकडे गेली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ग्रामीण भागात होणाऱ्या नियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला रात्री अंधारात बसावे लागत असून गृहिणींना स्वयंपाकापासून इतर दैनंदिन कामांत मोठ्या अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचेही नुकसान होत असल्याने शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे, याकडे आ.डॉ.गुट्टे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

या लोडशेडिंगचे मूळ कारण तांत्रिक असून ‘मिक्स फिडर’ पद्धत हेच त्याचे प्रमुख कारण आहे, असे आमदारांनी स्पष्ट केले. गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा, तांदूळवाडी, माखणी, कोद्री, खळी, महातपुरी, झोला तसेच पालम तालुक्यातील केरवाडी, पेठ पिंपळगाव, नाव्हा, अंजनवाडी, बनवस, तांदूळवाडी, चोरवड, सायळा, गुळखंड, डिग्रस, पेंडू, पेठशिवणी, पारवा, शेखराजूर, कोनेरवाडी, गोदावरी आणि पूर्णा तालुक्यातील देऊळगाव, लक्ष्मी नगर, चुडावा, गौर, हिवरा, आलेगाव, ताडकळस नवीन, ताडकळस एजी आदी गावांमध्ये गावठाण व शेतीसाठी एकच फिडर आहे. मिक्स फिडर असलेल्या ठिकाणी लोडशेडिंगची तीव्रता अधिक असल्याने फिडर सेपरेशन हाच यावरील कायमस्वरूपी उपाय आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी निदर्शनास आणून देण्यात आले.

हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने यापूर्वीच पावले उचलली आहेत, याची जाणीव असल्याचे आमदारांनी सांगितले. मिक्स फिडर वेगळे करण्यासाठी बी.एल.टी.कॉन या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. शासनाने दिलेली मुदत संपून पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ देऊनही कंपनीने अद्याप फिडर सेपरेशनचे काम पूर्ण केलेले नाही. कंत्राटदाराच्या या दिरंगाईमुळे मतदारसंघातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

लोडशेडिंगची समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. काम पूर्ण न करणाऱ्या कंपनीवर योग्य ती कारवाई करून फिडर सेपरेशनचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी विनंती करण्यात आली. वीज हा आजच्या काळात मूलभूत अधिकार असून तो मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला सुरळीतपणे मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आ.डॉ.गुट्टे यांनी मांडली. शिवाय नागरिकांना या नाहक त्रासातून मुक्त करावे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच गंगाखेड तालुक्यातील गणेशपुरी मठ संस्थान क्षेत्र विकासाचा मुद्दाही मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. हे मठ संस्थान अत्यंत प्राचीन असून सुमारे ७०० वर्षांची परंपरा असल्याचे समाधी स्थळावरील दगडातील कोरीव लेखांवरून स्पष्ट होते. बालाघाट डोंगर रांगेत वसलेल्या या पवित्र स्थळी माळरानावरही दहा फूट खोल तीर्थकुंड असून दुष्काळातही तेथे पाणी असते. जागृत देवस्थान असल्याने परिसरातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.

या देवस्थानात दर्शनासाठी दरमहा किमान ३० हजारांहून अधिक भाविक येतात. मात्र, भौतिक सेवा-सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते व राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. मठ संस्थानाकडे मोठी गोशाळा असून नागरिक व गोवंशासाठी तात्पुरती पाण्याची व्यवस्था आहे, ती कायमस्वरूपी करणे गरजेचे आहे. याशिवाय भक्त निवासस्थान, मोठे सभागृह, सभामंडप, शौचालय, विशेषतः महिला शौचालय, गोशेड आदी विकासकामे करण्याची आवश्यकता असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शिवाय गणेशपुरी मठ संस्थानाकडे स्वतःच्या मालकीची २०० एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक विकासकामे करणे शक्य आहे. प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेल्या या मठाचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आ.डॉ.गुट्टे यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या दोन्ही विषयांवर सखोल माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.डॉ.गुट्टे यांना दिले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles