परभणी, दि. 14 : परभणी जिल्ह्यात महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच इतर महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये *जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण* यांनी पारदर्शकता, नियमबद्धता आणि प्रशासकीय निकड यांना सर्वोच्च प्राधान्य देत बदल्यांचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अनेक वर्षे एकाच तालुक्यात अथवा उपविभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपविभागाबाहेर म्हणजे गंगाखेड,पाथरी,सेलू, परभणी या उपविभागातील तालुक्या बाहेर बदल्या करून त्यांनी महसूल प्रशासनात गतिमानता आणि कार्यक्षमतेचा संदेश दिला आहे.
राज्य शासनाच्या बदली धोरणानुसार आणि प्रशासकीय गरजांचा सखोल विचार करून जिल्हाधिकारी यांनी बदल्यांची प्रक्रिया राबविली. जिल्ह्यातील 9 सहायक महसूल अधिकारी, 17 मंडळ अधिकारी, 51 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि 5 महसूल सहायकांच्या बदल्या करण्यात आल्या.
या प्रक्रियेत तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना तसेच संबंधित संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन संवाद साधण्यात आला. बदल्यांबाबत कर्मचाऱ्यांना पर्याय देण्यात आले तसेच प्राप्त पर्याय, सेवाज्येष्ठता, रिक्त पदांची उपलब्धता, प्रशासकीय गरज आणि शासनाने निश्चित केलेल्या निकषांचा वस्तुनिष्ठ विचार करण्यात आला.
नागरी सेवा मंडळातील प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आणि उपविभागीय अधिकारी (परभणी) उदयसिंह भोसले व आस्थापना विभागातील नायब तहसीलदार प्रशांत वाकोदकर तसेच राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, महसूल कर्मचारी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर सूर्यवंशी, सचिव राजकुमार चिकटे, सहाय्यक महसूल अधिकारी उमेश फुलपगार, महसूल सहाय्यक जगदीश दुधारे, विठ्ठल मोरे आदिंनी योग्य ते सहकार्य केले.
विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने निर्माण होणारी प्रशासकीय स्थिरता आणि हितसंबंधांची शक्यता लक्षात घेऊन अनेक कर्मचाऱ्यांच्या उपविभागाबाहेर बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे महसूल यंत्रणेत नवीन कार्यसंस्कृती, उत्तरदायित्व आणि जनतेप्रती अधिक संवेदनशील प्रशासन उभे राहण्यास मदत होणार आहे.
बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा वशीला, राजकीय दबाव किंवा वैयक्तिक हितसंबंध यांना थारा न देता केवळ नियम आणि प्रशासनाच्या गरजांच्या आधारे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात आश्चर्य व्यक्त झाले असले तरी बदल्या पूर्णपणे निकषाधारित आणि पारदर्शक असल्याची भावना महसूल यंत्रणेत निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बदल्यांच्या माध्यमातून ‘करपून गेलेली भाकरी जिल्हाभर फिरवण्याचा’ धाडसी निर्णय घेत महसूल प्रशासनात कार्यक्षमतेला चालना दिली आहे. पारदर्शकता, निष्पक्षता आणि प्रशासकीय उत्तरदायित्व यांचा संगम साधत त्यांनी बदल्या कशा कराव्यात याचा एक आदर्श नमुना उभा केला असल्याची प्रतिक्रिया महसूल क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
महसूल प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेली ही बदली प्रक्रिया भविष्यात इतर विभागांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






