परभणी, दि. 23 : थॅलेसिमियासारख्या गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीतून नवजीवन मिळाले. परभणी येथील देवगिरी हॉस्पिटलमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या अर्जुन जगताप (रा. पूगळा, ता. जिंतूर) या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
थॅलेसिमिया हा रक्ताचा आजार असून, अशा बालकांना दर 15 दिवसांनी रक्त चढवावे लागते. मात्र, सततच्या रक्तसंक्रमणामुळे शरीरात लोहाचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढते आणि ते विविध अवयवांमध्ये साचून गंभीर गुंतागुंत निर्माण करते. औषधोपचार (चीलेशन थेरपी) करूनही नियंत्रण न झाल्यास शेवटी शस्त्रक्रिया हाच पर्याय उरतो.
अर्जुनच्या बाबतीतही स्प्लिनमध्ये वाढलेल्या लोहामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. अशा वेळी सदर हॉस्पिटलमध्ये डॉ. गबाळे यांच्या पुढाकाराने व डॉ. दीपाली कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. “ही शस्त्रक्रिया म्हणजे थॅलेसिमिया मुक्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे अभियानाचे राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त बालकांवरील अशी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली आहे. यापूर्वी अशा रुग्णांना बाहेर जिल्ह्यात पाठवावे लागत होते. त्यामुळे पालकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, मुख्यमंत्री सहायता निधीमुळे तात्काळ शस्त्रक्रिया करता आल्याने ही मदत जीवदायी ठरली आहे.






