परभणी जिल्ह्यातील मोजे वरपूड येथे दिनांक 12 मार्च 2026 रोजी पशुवैद्यकीय चिकित्सालय पिंगळी, पशुविज्ञान महाविद्यालय परभणी आणि कै. अंबादासराव वरपूडकर कृषी महाविद्यालय वरपूड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशुरोग निदान, उपचार व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन श्री. सुशील भैय्या वरपूडकर यांच्या हस्ते गौपूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुप्रजनन विभाग प्रमुख डॉ. सौ. मंजुषा पाटील या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पशुशस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. शरद चेपटे, पशुवैद्यकीय औषध विभागाचे डॉ. पंकज हसे तसेच डॉ. सय्यद मुजीब उपस्थित होते.
यावेळी डॉ. शरद चेपटे यांनी पशुकर्करोगाची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. पंकज हसे यांनी जंत निर्मूलन व लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. सय्यद मुजीब यांनी लाळ्या-खुरकूत रोगाची कारणे, लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. सौ. मंजुषा पाटील यांनी पशुप्रजनन व्यवस्थापन व पशुवंधत्व निवारण याबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरात एकूण 281 पशूंना लाळ्या-खुरकूत रोगावरील लस देण्यात आली. याशिवाय 4 शस्त्रक्रिया, 18 गर्भधारणा तपासण्या तसेच 14 पशुवंधत्व निवारण व उपचार करण्यात आले. उपस्थित पशुपालकांना जंत निर्मूलनाच्या गोळ्या व खनिज मिश्रणाचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कै. अंबादासराव वरपूडकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. चंद्रदीप डोंगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाहेद देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आर. बी. रणेर, एस. के. हराळ, संजय अवरगंड, प्रकाश शिंदे व शुभम कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.






