spot_img
spot_img
spot_img

गंगाखेडच्या प्रलंबित विकासकामांचा मुद्दा विधानसभेत आ.डॉ.अतुलबाबा भोसलेंनी लक्षवेधीद्वारे मांडला प्रश्न : धानोरा काळे व वझूर पुलांबाबत सरकार सकारात्मक

 

गंगाखेड (प्रतिनिधी) :
स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या कामानिमित्त मतदारसंघात उपस्थित असताना त्यांच्या विनंतीवरून येथील विविध प्रलंबित विकासकामांचा मुद्दा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून प्रभावीपणे उपस्थित केला. त्यांच्या या लक्षवेधीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर देत शासनाने संबंधित विषयांची गंभीर दखल घेतली असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सभागृहात स्पष्ट केले.

लक्षवेधीत आ. डॉ.भोसले यांनी मौजे धानोरा काळे (ता: पूर्णा) येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या रखडलेल्या कामाकडे शासनाचे लक्ष वेधले. सन २०२१ पासून सुरू असलेल्या या पुलाचे सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाले असले तरी दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम अपूर्ण असल्यामुळे पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. परिणामी, विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून दळणवळणावरही गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याचबरोबर डिग्रस बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करता येत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नसून त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचेही आ. भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच मौजे वझूर (ता. पूर्णा) येथील गोदावरी नदीवरील पुलाचे कामही २०२१ पासून सुरू असून निर्धारित मुदत उलटूनही ते अद्याप अपूर्ण आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही ही दोन्ही महत्त्वाची विकासकामे रखडलेली असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही बाब केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून जनतेच्या विश्वासालाही धक्का देणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही पुलांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करणे, कामातील विलंबाची सखोल चौकशी करणे, दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे तसेच या प्रकल्पांचे कालबद्ध नियोजन सभागृहासमोर सादर करावे, अशीही ठाम मागणी आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी केली.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आ.डॉ.गुट्टे यांच्या विनंतीवरून विधानसभेच्या पटलावर प्रभावीपणे मांडल्याबद्दल कराड दक्षिणचे आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, शासनाने आता प्रत्यक्ष कृती करून रखडलेल्या विकासकामांना गती द्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या सर्व बाबींची शासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रकरणांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सभागृहात सांगितले. त्यामुळे धानोरा काळे व वझूर येथील रखडलेल्या पुलांच्या कामांना लवकरच गती मिळेल, असा विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles