परभणी, दि. 11 : आगामी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, तसेच आपत्ती काळात मदत व पुनर्वसन कार्य तात्काळ सुरू करून नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
बैठकीस महापौर सय्यद इकबाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथकांची तयारी, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण भागातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.
संभाव्य पूरस्थिती, वीज गळती, आरोग्यविषयक आपत्ती आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभागाने आपआपल्या जबाबदाऱ्या निश्चित करून तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा, मासोळी तसेच इतर लहान-मोठ्या नद्यांमुळे काही गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व यंत्रणांनी दक्ष राहून मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील आपत्ती पूरप्रवण गावात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक साहित्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले.
आरोग्य विभागाने ग्रामीण भागात जलजन्य आजारांवरील उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्यावेत. औषधसाठा, रक्तसाठा आणि अन्य आवश्यक साहित्य मुबलक प्रमाणात ठेवण्यासोबतच साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले. मुबलक ब्लिचिंग पावडरचा सुरक्षित वापर आणि साठवणूक करण्यावरही भर देण्यात आला.
बैठकीत एल-निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या पावसाच्या अनिश्चिततेबाबत माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी बदलत्या हवामान परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तालुकास्तरावरही संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आपत्तकालीन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी दिल्या. नागरिकांनी विशेषतः शेतकरी आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दामिनी ॲपसह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित मोबाईल ॲप डाऊनलोड करून सज्ज राहावे, असे आवाहनही करण्यात आले.
धरणांची दुरुस्ती, पूर रेषा क्षेत्रातील बांधकामांवर नियंत्रण, शहरातील नाल्यांची स्वच्छता आणि धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी सुरक्षित स्थळांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण, शिक्षण, पशुसंवर्धन, कृषि विभागांनीही आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेला निर्देश देण्यात आले.
पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नदीपात्रातील पाणीपातळी व धोक्याच्या इशारा पातळीबाबत सर्व विभागांशी समन्वय ठेवावा, असे निर्देश देण्यात आले. नगरपालिका प्रशासनाने शहरातील नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर करण्यास सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सादरीकरणाद्वारे विभागनिहाय कार्यवाहीची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी आभार मानले.






