spot_img
spot_img
spot_img

परभणीत विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते थाटात उदघाटन*

 

 

परभणी, दि. 3 — छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2026 चे आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. यंदा परभणी जिल्हयाला या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत पालकमंत्री यांनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. दैनंदिन कामाचा ताण-तणाव हलका होण्यासाठी खेळ आवश्यकच असून मानसिक आरोग्य आणि फिटनेससाठी प्रत्येकाने खेळ अवश्य खेळावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या या सोहळयात विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

 

आज भव्य स्वरुपात व उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, सह आयुक्त पुनर्वसन राजेश काटकर, अपर आयुक्त (महसूल) रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह विभागातील सर्व जिल्हयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रारंभी पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उदघाटन पार पडले. यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. मशालीने क्रीडा ज्योत पेटविण्यात आली. विविध जिल्हयातून आलेल्या स्पर्धांकांनी अतिशय शिस्तबध्द पध्दतीने मान्यवरांना मानवंदना दिली. काही जिल्हयाच्या कर्मचाऱ्यांनी पारंपारिक वेशभुषेत मानवंदना दिली. सर्व स्पर्धकांना क्रीडा शपथ देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांनी तयार केलेल्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.

 

पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, सर्वसामान्यांच्या हितासाठी अधिकारी-कर्मचारी वर्षभर काम करीतच असतात. मात्र, काम करीत असताना शारिरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी खेळ किंवा छंद जोपासणे आवश्यक आहे. अशा स्पर्धांमधून कर्मचाऱ्यांना एक नवी ऊर्जा मिळते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. शंभर आणि दीडशे दिवसांच्या उपक्रमात विभागातील अनेक कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्या सकारात्मकतेमुळेच असे उपक्रम यशस्वी होतात, ही अतिशय समाधानाची बाब असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

 

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले की, दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या या स्पर्धा एक कौटुंबिक सोहळाच आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर हा सर्वात मोठा विभाग आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी या विभागातील सर्वच अधिकारी , कर्मचारी सक्रीयतेने काम करतात. शासनाच्या अनेक योजना, उपक्रम प्रभावीपणे विभागात राबविण्यात येतात. ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे. कर्मचाऱ्यांना या कामातून थोडा रिलिफ मिळावा म्हणून स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या सोहळयात सर्वांनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 एप्रिलपासून राज्यात ‘साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. तरी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयजीओटी (IGOT) कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग-इन करून कोर्स पूर्ण करावेत, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

 

कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांनी क्रीडा स्पर्धांमधून कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा व सकारात्मकता लाभते, असे सांगून सहभागी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

 

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी परभणी जिल्हयाला मिळालेल्या यजमान पदाबद्दल आभार व्यक्त करत स्पर्धेचे अतिशय चांगल्या पध्दतीने नियोजन करण्यात आल्याचे सांगून सर्व स्पर्धकांनी उत्साहाने आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे, असे आवाहन केले. विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना एकत्र आणणारा हा सोहळा मानसिक आरोग्य आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अतिशय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना अमेरिकेतील यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिलचा “आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी यावेळी पालकमंत्री यांचे अभिनंदन केले.

 

निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

पारितोषिक वितरण व समारोप समारंभ दि. 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4.00 वा. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles