विविध विभागांच्या कामांचा आढावा
सार्वजनिक निधीचा अपव्यय टाळण्यासह प्रलंबित प्रकल्पांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश
‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’चे केले कौतुक
परभणी, दि. 31 – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. जिल्ह्यातील विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावेत. प्रकल्पांचे अंदाजपत्रक तयार करताना कोणतीही बाब अपूर्ण राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत डॉ. पुलकुंडवार यांनी विविध विभागांच्या योजना, विकासकामे आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, महसूल विभागाची कामे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान, पर्जन्यमान तसेच जनगणना-2027 संदर्भातील माहिती सादर केली. त्यानंतर विविध विभागप्रमुखांनी आपापल्या विभागातील योजना व विकासकामांच्या प्रगतीचे सादरीकरण केले.
डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल विभागाने सातबारा अद्ययावत करण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू ठेवावी, ग्रामपातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहावे तसेच ‘आपले सरकार’ आणि पीजी पोर्टलवरील नागरिकांच्या तक्रारींचे विहित कालावधीत निराकरण करावे, असे निर्देश दिले.
जिल्ह्यात रोजगारनिर्मिती आणि उद्योगवृद्धीला चालना देण्याबरोबरच बचतगटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच बालविवाह प्रतिबंधासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने प्रभावीपणे काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रस्त्यांची गुणवत्ता कायम राखण्यावर विशेष भर देतानाच विकासकामांमध्ये सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही, याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी. प्रलंबित प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.
पालक सचिवांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून तत्परतेने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी यावेळी दिली.
आपत्ती काळातील ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’चे पालक सचिवांकडून कौतुक
बैठकीदरम्यान पालक सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’ची माहिती घेतली. आपत्तीच्या काळात नागरिकांपर्यंत तातडीच्या सूचना, सतर्कतेचे संदेश आणि आवश्यक माहिती जलदगतीने पोहोचविण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त असल्याचे नमूद करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्यक्ष संदेशही प्रसारित केला. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेवर आणि अचूक माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
‘शुभमंगल… थोडं सावधान’ लघुपटाचे विमोचन
पालक सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते ‘शुभमंगल… थोडं सावधान’ या लघुपटाचे विमोचन करण्यात आले. बालविवाह प्रतिबंधाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या लघुपटाचे त्यांनी कौतुक केले.
बालविवाहासारख्या सामाजिक समस्येला आळा घालण्यासाठी जनजागृतीसोबतच सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रभावी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.











Total Users : 254692