परभणी, दि. ५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान कर्मचारी, मायक्रो ऑब्झर्वर तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आले.
या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निवडणुकीतील विविध बारकावे समजावून सांगत निवडणूक प्रक्रिया अत्यंत दक्षता व लक्षपूर्वक पार पाडण्याच्या सूचना दिल्या. उपजिल्हाधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर निवडणुकीसाठी मतदान मतपेटीव्दारे घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने मतपेटी हाताळणी व मतदान प्रक्रिया याबाबत यावेळी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी (पाथरी) संगीता चव्हाण, उपविभागीय अधिकारी (वसमत) श्री. माने, उपविभागीय अधिकारी (कळमनुरी) प्रतीक्षा भूते यांच्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तसेच निवडणूक विभागाचे सहाय्यक महसूल अधिकारी दत्ता गेनगिने, महसूल सहाय्यक आबा लोखंडे व तांत्रिक कर्मचारी दिवाकर जगताप यांनीही सहभाग घेतला.






