गंगाखेड (प्रतिनिधी) :-
ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकरी बांधवांचे दळणवळण अधिक सुलभ करण्यासाठी दर्जेदार शेत-पांदण रस्त्यांची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. वाहतूक आणि दैनंदिन शेतीविषयक कामांना गती देण्यामध्ये या रस्त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येत असून, गावोगावी दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिली.
मौजे.अकोली येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्त्याचे भूमिपूजन आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जायकवाडी धरण आवर्तन संदर्भात सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांना आवश्यक तो पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, ग्रामीण विकासाची संकल्पना केवळ रस्त्यांपुरती मर्यादित नसून, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे आणि शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणे अपेक्षित आहे. कारण शेत-पांदण रस्त्यांमुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या दळणवळणाच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार असून, नियोजित रस्ता स्थानिक शेतकरी बांधवांसाठी निश्चितच सोयीचा ठरेल.
शेती हा ग्रामीण जीवनाचा आणि अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असल्याने शेतीला पूरक सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी अशा पायाभूत प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. कारण रस्त्यांची उपलब्धता म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांना, कृषी उत्पादनाच्या व्यवस्थापनाला आणि ग्रामीण भागातील प्रगतीला मिळणारे बळ आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी अधोरेखित केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती लक्ष्मण मुंडे, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पोले, सभापती मनोज मुंडे, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्त्याचे सहअध्यक्ष तुकाराम पाटील, तालुका प्रभारी बालाजी लटपटे, शंभूदेव मुंडे, विकास लटपटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Total Users : 255289