गंगाखेड (प्रतिनिधी) :-
ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या दृष्टीने वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे गावठाण भागातील रात्रीचे लोडशेडींग बंद करा. तसेच मतदारसंघातील शेतीपंपांना नियमित आणि किमान १४ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करा. शिवाय शेतीसाठी आवश्यक असलेले ट्रान्सफॉर्मर, नवीन डीपी आणि विद्युत यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच भविष्यात वाढणारी मागणी लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने कामे करा. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेऊन त्यासाठी आवश्यक कार्यवाही करा. त्यासाठी गावठाणासह शेतीपंपाना नियमानुसार सुरळीत वीजपुरवठा करा असे स्पष्ट निर्देश स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील महावितरण उपविभागीय कार्यालय येथे आ.डॉ.गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी ते बोलत होते. याप्रसंगी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या, जनसामान्यांच्या अडचणी आणि प्रलंबित विकासकामांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. तसेच गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यातील वीजपुरवठ्याची सद्यस्थिती, नागरिक व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी आ.डॉ.गुट्टे यांनी विविध विषयांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या.
बैठकीत गावठाण भागात सायंकाळी ६ ते १० या वेळेत निर्माण होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर विशेष चर्चा झाली. या कालावधीत अनेक गावांमध्ये कमी दाबाचा व अनियमित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देण्यात आले. याचबरोबर अनेक दिवसांपासून रखडलेले वीजविषयक प्रश्न प्राधान्याने निकाली काढून सर्व प्रलंबित प्रकरणांवर वेळेत कार्यवाही करण्याचे आदेशही आ.डॉ.गुट्टे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी धोकादायक अवस्थेतील वाकलेले विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारा आणि जीर्ण झालेल्या विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक त्या सर्व भागात भूमिगत किंवा संरक्षित केबलिंगची कामे पूर्ण करणे, बिघडलेले रोहित्र त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करणे, नवीन रोहित्र बसविणे तसेच अपूर्ण विद्युत विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना राबविण्याबरोबरच गरजेनुसार एचआरसी बॉक्ससाठी निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही आ.डॉ.गुट्टे यांनी दिल्या.
शेतीसाठी आवश्यक त्या ठिकाणी एसडीटी ट्रान्सफॉर्मर बसविणे, वाढत्या वीजभाराचा विचार करून नवीन डीपी उभारणे आणि त्यासाठी जागेची आवश्यकता भासल्यास स्थानिक पातळीवर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल, अशीही भूमिका आ.डॉ.गुट्टे यांनी मांडली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि महावितरण यांनी समन्वयाने काम केल्यास मतदारसंघातील बहुतांश वीजविषयक समस्या कायमस्वरूपी मार्गी लागू शकतात, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोले यांनी बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वीजविषयक अडचणी प्राधान्याने सोडवून प्रलंबित कामांना गती दिली जाईल. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोले, कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, उपकार्यकारी अभियंता गंगाखेड सतीश गुडे, उपकार्यकारी अभियंता पालम श्री रावडे, उपकार्यकारी अभियंता पूर्णा श्री पांचाळ, सहाय्यक अभियंता पंकज गुहे यांच्यासह गुट्टे काका मित्रमंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Total Users : 254692