पूर्णा (प्रतिनिधी):-
ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे धनगर टाकळी (ता.पूर्णा) येथील सुपुत्र शेख हारून शेख फरीद. वनरक्षक म्हणून जबाबदारीची सेवा बजावत असताना क्रीडाक्षेत्रातही त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून केवळ आपल्या गावाचे नव्हे, तर संपूर्ण गंगाखेड मतदारसंघाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीचा गौरव करत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते त्यांचा मुंबई येथे विशेष सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान आ.डॉ.गुट्टे यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. तसेच त्यांच्या संघर्षमय प्रवासाची, मेहनतीची आणि क्रीडाविषयक जिद्दीची माहिती सविस्तर घेतली.
वनरक्षक म्हणून सेवा देताना जंगलांचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे शेख हारून हे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःच्या स्वप्नांसाठी घाम गाळणारे धावपटू आहेत. दिवसभर कर्तव्य आणि पहाटे अथक सराव अशी त्यांची दिनचर्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या ध्येयासाठी सातत्याने मेहनत घेत राहिल्यास यश निश्चित मिळते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. मर्यादित साधनसामग्री, ग्रामीण वातावरण आणि जबाबदाऱ्यांचे ओझे असूनही त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली, ते खरोखरच कौतुकास्पद आहे, असेही गौरोदगार आ.डॉ.गुट्टे यांनी काढले.
धनगर टाकळीसारख्या गावखेड्यात राहून राष्ट्रीय पातळीवर पोहोचणे, हे सहजसाध्य काम नाही. त्यासाठी लागते ती अथक मेहनत, स्वतःवरचा विश्वास आणि परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद. शेख हारून यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर ही अशक्य वाटणारी वाट पार केली. त्यामुळे त्यांचे यश आज हजारो युवकांच्या डोळ्यांत नवे स्वप्न निर्माण करत आहे. तसेच नाशिक येथे पार पडलेल्या मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. १० कि.मी. आणि ५ कि.मी. मॅरेथॉन स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर १ सुवर्णपदक आणि २ रौप्यपदकांची कमाई करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून ग्रामीण भागातील युवकांमध्ये नवी उमेद निर्माण करणारी घटना असल्याचेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून नमूद केले.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनीही शेख हारून यांच्या कामगिरीची सविस्तर माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. अशा गुणी आणि प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच ग्रामीण भागातील प्रतिभावान युवकांना योग्य दिशा आणि पाठबळ मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात. त्यांच्या धावण्यातील प्रत्येक पाऊल हे आपल्या मातीतून उभ्या राहणाऱ्या संघर्षशील तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे ठरेल, याचाही पुनरुच्चार वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. दरम्यान शेख हारून यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील काळात ते आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
चौकट क्रमांक १
राष्ट्रीय स्तरावर चमकलेला वनरक्षक…
नाव : शेख हारून शेख फरीद
गाव : धनगर टाकळी, ता.पूर्णा
सेवा : वनरक्षक
विशेष कामगिरी : मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय यश
मिळवलेली पदके : १ सुवर्णपदक, २ रौप्यपदके
स्पर्धा प्रकार : ५ कि.मी. व १० कि.मी. मॅरेथॉन
विशेषता : कर्तव्य आणि क्रीडा यांची प्रेरणादायी






